कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या हिरकणी मंचातर्फे विद्यार्थिनींसाठी आयोजित पारंपरिक ‘गौराई खेळ’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १०० हून अधिक विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत झिम्मा, फुगडी, घागर घुमवणे, काठवट-काना, सूप नाचवणे तसेच विविध गौरीगीते सादर केली.
पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके आणि सौ. मधुरा नरके यांच्या हस्ते गणेश-गौरी पूजन व मंगलारतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थिनींनी पारंपरिक खेळ आणि लोककला सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.
‘सावित्री ग्रुप’ प्रथम
झिम्मा स्पर्धेत सावित्री ग्रुपने प्रथम, सिव्हिल गर्ल्स ग्रुपने द्वितीय, तर राजमुद्रा ग्रुपने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना करवीर भूमी अभिलेख विभागातील श्रीमती संगीता पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके आणि परीक्षक सुलोचना बागडी यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हिरकणी मंचाच्या प्रमुख प्रा. नीलम रणदिवे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शीतल साळोखे, तसेच प्रा. ऐश्वर्या पाटील, सिद्धी जाधव, सुहासी साळोखे, नेहा माने आणि गायत्री आयरे यांच्यासह सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

0 Comments