DY Patil Polytechnic Students Startup: निखिल-सिद्धेशने सुरू केला ‘श्रावणी नेक्सटेक’ स्टार्टअप

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी

शिक्षण घेत असतानाच स्वतःच्या कल्पनेला व्यावसायिक स्वरूप देत कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या दोन विद्यार्थ्यांनी स्वतःचा स्टार्टअप सुरू केला आहे. संगणक विज्ञान व अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात शिकणारे निखिल चव्हाण आणि सिद्धेश धुंदरे यांनी ‘श्रावणी नेक्सटेक’ या आयटी सेवा देणाऱ्या स्टार्टअपची सुरुवात केली असून, त्यांच्या उपक्रमाला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.



डी. वाय. पाटील पॉलिटेक्निककडून विद्यार्थ्यांना नवसंकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेसाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यातूनच निखिल आणि सिद्धेश यांना स्टार्टअपची संकल्पना सुचली. विविध ग्राहकांच्या आयटीविषयक गरजा लक्षात घेऊन त्यांनी तंत्रज्ञानाधारित उपाय विकसित करण्यास सुरुवात केली आणि या संकल्पनेचे व्यवसायात रूपांतर केले.

‘श्रावणी’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘ऐकणे आणि शिकणे’ असा होतो. ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार तंत्रज्ञानाधारित सेवा देणे, हे या स्टार्टअपचे वैशिष्ट्य आहे. वेबसाईट डिझाइन, डिजिटल मार्केटिंग, ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपाययोजना अशा विविध सेवा स्टार्टअपच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. यासाठी २० हून अधिक तंत्रज्ञानांचा वापर केला जात आहे.

प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच आपल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करून स्टार्टअप सुरू करणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगितले. योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास विद्यार्थी भविष्यात सक्षम उद्योजक बनू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून समाजोपयोगी सेवा आणि नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यावर भर देणार असल्याचे निखिल चव्हाण आणि सिद्धेश धुंदरे यांनी सांगितले.

या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. महादेव नरके, संगणक विभागप्रमुख डॉ. पी. के. शिंदे, प्रा. शीतल साळोखे आणि शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता आणि प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी निखिल व सिद्धेश यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments