‘युरेका’ स्पर्धेत डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग अव्वल

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या औद्योगिक युगात विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता नाविन्यपूर्ण विचार, कौशल्यविकास आणि उद्योजकीय दृष्टिकोन आत्मसात करून उद्योगक्षेत्रातील नवनवीन संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी केले.


डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या ई-सेलतर्फे आणि IIT Bombay National Entrepreneurship Challenge 2026 अंतर्गत ‘युरेका – उद्योजकीय पिच स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये Startup Culture, Creativity आणि Entrepreneurial Thinking विकसित करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेत ५७ संघांमधील तब्बल २१० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या नाविन्यपूर्ण व्यावसायिक आणि स्टार्टअप कल्पना सादर केल्या.

विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण विचार करावा

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी उद्योगक्षेत्रातील बदलते प्रवाह, औद्योगिक क्षेत्रातील प्रगती आणि भविष्यातील रोजगार व व्यवसायाच्या संधी यावर मार्गदर्शन केले.

बदलत्या औद्योगिक वातावरणाशी जुळवून घेत विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण विचार, कौशल्यविकास आणि उद्योजकीय दृष्टिकोन आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी उद्योगक्षेत्राचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये उद्योगक्षेत्राची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले.

सात संघांची अंतिम फेरीसाठी निवड

स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांनी विविध Business Ideas आणि Startup Concepts सादर केले. नावीन्यपूर्णता, व्यवहार्यता, बाजारपेठेतील क्षमता, Business Model आणि सादरीकरण कौशल्य या निकषांवर मूल्यांकन करण्यात आले.

या मूल्यांकनातून ७ संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.

या स्पर्धेसाठी युथकी मंत्रा सर्व्हिसेसचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप सूर्य, सेंट झेवियर्स हायस्कूलचे वरिष्ठ शिक्षक व एनसीसी अधिकारी अँथनी एस. डिसोझा, झेनिथ करिअर अकॅडमी, पेठ वडगावच्या संचालिका डॉ. माधवी रणजित सावंत आणि हाय फाईव्ह ए. आय., कोल्हापूरचे प्रादेशिक प्रमुख प्रवीण शर्मा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट प्रथम

‘युरेका’ उद्योजकीय पिच स्पर्धेत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटने प्रथम क्रमांक पटकावला.

डी. वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठ, तळसंदेने द्वितीय क्रमांक, तर डॉ. सायरस पूनावाला स्कूल, वडगावने तृतीय क्रमांक मिळवला.

कार्यक्रमाचे आयोजन प्रा. सागर जानराव यांनी केले. यावेळी स्कूल ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन अँड बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे संचालक डॉ. ए. एम. गुरव, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

या उपक्रमाला कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील आणि विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

Post a Comment

0 Comments